Sunday, 15 July 2012

स्त्रीभ्रूणहत्या आणि आपण


स्त्रीभ्रूणहत्या आणि आपण
                           डॉ. बाळकृष्ण बोकील.
सध्या स्त्रीभ्रूणहत्या हा विषय खूप चर्चेत आहे. हा विषय महत्वाचा आहे आणि त्यावर चर्चा होणे गरजेचेही आहे. चर्चा झाल्यामुळे एखाद्या प्रश्नाच्या विविध बाजू समोर येतात. त्यामुळे एक प्रकारे समाजप्रबोधन घडून येते. त्यातून समाजाची मानसिकता तयार होण्यास मदत होते. सामाजिक विकासासाठी या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे उपयोग होतो.
स्त्रीभ्रूणहत्या या विषयावरील चर्चेकडे मी जेव्हा या दृष्टीने पाहतो तेव्हा मला त्यामध्ये अनेक धक्कादायक घटक दिसतात. त्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की स्त्रीभ्रूणहत्येशी आपला काहीही संबंध नाही असा प्रत्येकाचा असलेला समज. या बाबतीत आपण जरा सखोल विचार करायला हवा असे मला वाटते. त्या दुर्दैवी बाळाची आई किंवा कुटुंबीय हत्येच्या या क्रूर आणि कठोर निर्णयापर्यंत का येतात हे समजून घेणे आवश्यक आहे. याचे कारण उघड आहे. `मुलगी नको` या मानसिकतेतून लोक या थराला जातात ही गोष्ट आता सगळ्यांना माहीत झालेली आहे. पण `मुलगी नको` असा विचार एखाद्याच्या मनात का येतो?
आपली पुरूषप्रधान विचारसरणी याला कारणीभूत आहे. आपण स्त्रीला नेहमीच पुरुषापेक्षा कमी लेखत आलो आहोत. स्त्रीचे स्थान दुय्यम आहे असे आपण कायम गृहीत धरत आलो आहोत. तात्विक चर्चेमध्ये काहीजण स्त्रीला देवता वगैरे म्हणतात पण व्यवहारात मात्र त्यांचे वागणे स्त्रियांना कमी लेखणारे असते. लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत सर्व अवस्थांमध्ये हेच चित्र दिसते. लहानपणी वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलगा यांच्यावर ( या पुरुषांवर ) स्त्रीने अवलंबून राहावे अशीच आपली पक्की समजूत असते. प्रत्येक गोष्टीसाठी कुणावर तरी अवलंबून राहणे हे त्रासदायक असते. आपले वागणे- बोलणे, आपली मते, आपले विचार, आपले निर्णय, आपल्या आवडी-निवडी या सगळ्या बाबतीत मग बंधने येतात. आर्थिक बाबतीतील अशी बंधने जीवनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करतात. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही बाबतीत हे सत्य आहे, पण स्त्रियांच्या बाबतीत याची भीषणता अधिक आहे. समाजाकडे न्याय मागावा तर समाजावर परंपरा आणि चालीरीती यांचा इतका जबरदस्त पगडा आहे की न्यायाच्या ऐवजी अन्यायच पदरी पडतो. एक प्रसिद्ध नाट्यगीत असे आहे,
परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला,
सजीवपणी घडती सारे मरणभोग त्याला
सौख्यभोग इतरां सारे, कष्ट मात्र याला.
हे या ठिकाणी अक्षरशः खरे ठरते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कुटुंब, समाजकारण, अर्थकारण, राजकारण या सर्व बाबतीत दुय्यम स्थान असलेल्या स्त्रीला आयुष्यभर  फक्त कष्ट करावे लागतात. त्यागाच्या गोंडस बुरख्याखाली या यमयातना तिला आयुष्यभर सोसाव्या लागतात. तिची प्रचंड मानसिक घुसमट होते.
हे सगळ्यांनाच माहीत असते. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर हे चुकणार नसते. मग असा हा स्त्रीजन्मच नको ही भावना वाढायला लागते. याशिवाय अनेक जुनाट कल्पना मनात पक्क्या रुजलेल्या असतात. `मुलगा हा वंशाचा दिवा`, `म्हातारपणी मुलगाच आधार देणार`, अशा खुळचट समजुती मुलाची भलावण करीत मुलीला नाकारत असतात. या सगळ्याचा परिणाम एकच. `मुलगी नको` या विचारावर सगळ्यांचे एकमत. समाजाचा नाकर्तेपणा येथे स्पष्टपणे दिसतो. जन्मानंतर स्त्रीला भोगायला लागणारा हा त्रास नाहीसा करण्याऐवजी समाज स्त्रीजन्मच नाहीसा करू बघतो. स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, नेते-कार्यकर्ते, सगळ्यांचे विचार एकाच प्रकारचे. मग  त्या बाळाच्या आईलाही तसेच वाटायला लागते. एखादी आई याला विरोध करतेही, पण तिचा क्षीण आवाज कुटुंबियांकडून कसा दाबला जातो हे कोणाला कळतही नाही. स्त्रीभ्रूणहत्येच्या सर्व घटनांशी संपूर्ण समाजाचा असा जवळचा संबंध आहे. मुलगी जन्माला येणे नकोसे वाटावे इतकी स्त्रियांची वाईट अवस्था आपण कळत-नकळत करून टाकली आहे.
मला जाणवलेला दुसरा मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा गैरवापर. गर्भलिंगनिदान आणि गर्भपात यांचे तंत्रज्ञान निर्माण झाले ते समाजाच्या हितासाठी, पण समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक या तंत्रज्ञानाचा गैरवापर सर्रासपणे स्वार्थासाठी करीत आहेत. समाजातील सुशिक्षित आणि जाणत्या लोकांनी या प्रवृत्तीच्या लोकांकडे काणाडोळा करून एक प्रकारे त्यांना अभय दिलेले आहे. आता ही प्रवृत्ती नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. कोणतेही तंत्रज्ञान वापरताना  काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये म्हणून नियम, कायदे करून त्यांची कठोरपणे अंमलबजावणी करायची असते हे आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांना अवाजवी स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा गैरफायदा हे घेऊन लोक स्वार्थ साधीत आहेत. शासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांनी अशा स्वार्थी आणि संधीसाधू लोकांवर वचक ठेवून त्यांना अशा गैरकृत्यांपासून रोखायला हवे. विशेषतः विरोधी पक्षनेत्यांनी अशा प्रवृत्तींवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनावर दबाव आणायला हवा. पण सर्व पक्षांनी याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केलेले आहे. सर्वसामान्य जनतेनेही पक्षनेत्यांकडे यासाठी आग्रह धरलेला नाही. म्हणजेच या बाबतीत शासन, लोकप्रतिनिधी आणि तुमच्यामाझ्यासारखे सामान्य लोक जबाबदारीने वागलेले नाहीत असे दिसते. या प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठविणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांच्या मागे आपण ठामपणे उभे राहायला हवे. शासनावर दबाव आणायला हवा.
सद्यपरिस्थितीत वरील दोन मुद्द्यांबाबत आपण सर्वसामान्य माणसांनी पुढील गोष्टी करायला हव्यात, असे मला वाटते.
(अ)  स्त्री-पुरुष समानता निर्माण व्हावी म्हणून:
१.     स्वतःपासून सुरवात करू या. स्त्रियांना कमी लेखणे थांबवू या.
२.     कुटुंबातील सर्व स्त्रियांना (लहान मुलींसह) सन्मानाने वागवू या.
३.     कुटुंबातील सर्व स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊ या. स्त्रियांना शिकायला वेळ मिळावा म्हणून त्यांना कामात मदत करू या. ह्यासाठी कुटुंबातील इतरांना तयार करू या. त्यासाठी आग्रह धरू या.
४.     कोणताही लहानमोठा निर्णय घेताना स्त्रियांचे मत विचारात घेऊ या.
५.     कुटुंबातील मुली आणि स्त्रिया स्वावलंबी होतील असे प्रयत्न करू या.
६.     स्त्रियांवर कळत-नकळत होणारे अत्याचार आणि अन्याय रोखू या.
७.     स्त्रियांसंबंधीचे कायदे समजून घेऊन त्याप्रमाणे वागू या.
८.     सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने वागवू या.
९.     वृद्धापकाळाची व्यवस्था करून ठेवू या, तसेच त्यासाठी सार्वजनिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू या. त्यासाठी तरुणपणी कर भरू या. पेन्शन, विमा अशा गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊ या. म्हातारपणी मुलगी तसेच जावयाची मदत आनंदाने स्वीकारू या.
    १०. स्त्री-बालकाचे स्वागत करू या, त्याचा आनंद जाहीरपणे व्यक्त करू या.
  (ब) तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी:
१.     आपण गर्भलिंगतपासणी करणार नाही असे जाहीर करू या आणि तसे           ठामपणे वागू या.
२.     गर्भलिंगतपासणी करणाऱ्यांना सर्व मार्गांनी समजावून सांगून त्यापासून रोखू या. ऐकले नाही तर कायद्याची जाणीव करून देऊन त्यापासून रोखू या. विरोधाला खंबीरपणे तोंड देऊ या.
३.     भ्रूणहत्या करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात जाहीर भूमिका घेऊ या. भ्रूणहत्या होऊ नये म्हणून काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना पाठिंबा देऊ या.
४.     भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू या.

आपण बरेच काही करू शकतो. आपण एकत्र येऊन भ्रूणहत्येचा प्रकार थांबविण्यासाठी त्वरित कृती करायला हवी.

------------------------------------------------------------------------------------   


Tuesday, 10 January 2012

शिक्षण आणि विकास

शिक्षण आणि विकास यांचा फार जवळचा संबंध आहे.